सातारा – चोराडे येथे रेशन दुकानावर छापा

पुसेसावळी – खटाव तालुक्यातील चोराडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमार्फत चालवण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर (रेशनिंग दुकान) छापा टाकला. गहू, तांदूळ व अन्य साहित्यांत सुमारे सोळा हजार किलोंची तफावत आढळून आल्याचे निष्पन्नरझाले आहे. या कारवाईमुळे खटाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
चोराडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमार्फत स्वस्त धान्य दुकान चालवले जाते. दुकानदाराचा मनमानी कारभार तसेच फक्त ई- पॉस मशिनवर अंगठा लावून धान्य देत नसल्याबाबतची तक्रार खटाव तालुका पुरवठा विभागामध्ये करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पुरवठा निरीक्षक ए.के.शिंदे यांनी या दुकानावर छापा टाकला. दुकानासमोर दुकान उघडण्याची व बंद करण्याची वेळ तसेच सुट्टीचा दिवस लिहिला नसल्याचे आढळले.
धान्यसाठा फलक अद्ययावत केला नसल्याचे, धान्य नोंद व धान्य विक्री वही अद्ययावत केली नसल्याचे, ई- पॉस मशिनद्वारे काढलेली पावती ग्राहकांना दिली जात नसल्याचे, दुकानात तक्रार वही प्रमाणित केली नसल्याचे आढळून आले. दुकानामध्ये ई- पॉस मशिनीनुसार वाटप व प्रत्यक्ष शिल्लक धान्य यांची तफावत आढळून आली. यामध्ये 9356 किलो गहू, 6806 किलो तांदूळ अशी 16162 किलोची कमतरता जाणवली. प्रत्यक्ष दुकानात 250 किलो गहू, 1600 किलो तांदूळ, 83 किलो साखर एवढाच साठा निदर्शनास आला आहे. ही तपासणी चार पंचांच्या साक्षीने पूर्ण करण्यात आली. तपासणी बरोबर असल्याची सही तपास अधिकाऱ्यांनी, सोसायटीचे चेअरमन व कामगार यांनी पत्रकावर केली आहे. यामुळे या धान्य दुकानात सुमारे 16 हजार किलोची अफरातफर दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे.





