राहुरी: ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा न झाल्यास महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडू – माजी मंत्री प्राजक्त तनपुरे

राहुरी – ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा झाला नाहीतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून घेऊ, असा सज्जड इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज दिला. राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे पूर्ण झालेला सौर कृषी वाहिनी प्रकल्प ताबडतोब चालू करावा. या मागणीसाठी तनपुरे यांच्या नेतृत्वात आज आरडगांव येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तनपुरे बोलत होते.
प्राजक्त तनपुरे हे ऊर्जामंत्री असताना राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे चार मेगावॅटचा सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात आला. प्रकल्प पूर्ण होऊन सुमारे सहा महिने झाले. मात्र अद्याप प्रकल्प चालू केला नाही. ऊर्जा प्रकल्प ताबडतोब चालू करावा यासाठी राहुरी नेवासा रस्त्यावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी तनपुरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी चढ्या भावाने कोळसा खरेदी करण्यात आला. मात्र सध्याच्या भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या जीवाची पर्वा नसल्याचे दिसत आहे. दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्रीच्या वेळी शेतातील कामे करावी लागतात.
या दरम्यान शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा बळी देखील गेला आहे. केवळ श्रेयवादामुळे आरडगाव येथील सौर कृषी वाहिनी प्रकल्प थांबविण्यात आला, असा आरोप करून ३१ मार्च पर्यंत प्रकल्प चालू झाला नाहीतर महावितरण च्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून तीव्र आंदोलन करु, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
यावेळी सुनील मोरे म्हणाले की, सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकास कामे व प्रकल्प उभारण्यात आले. मध्यंतरी आचारसंहितेच्या नावाखाली विकास कामे थांबविण्यात आली. आणि आता श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा खटाटोप चालू असल्याचा आरोप सुनिल मोरे यांनी केला. यावेळी बाळासाहेब पेरणे, सदाशिव तारडे, बाळासाहेब आघाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ३१ मार्च पर्यंत प्रकल्प चालू करु, असे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.





