राहुरी: वडनेर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

राहुरी – वडनेर (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वडनेर शिवारातील गव्हाणे वस्ती येथील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे उर्फ बोजी हे आज सोमवारी पहाटे ४ वाजेदरम्यान मकाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात गव्हाणे हे जागेवर ठार झाले आहे. सकाळी घरातील सदस्य शेतातून शोभचंद गव्हाणे घरी का परतले नाही हे पाहण्यासाठी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्यासह वनविभाग कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वडनेर परिसरात शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. पोलीस व वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. वन अधिकारी युवराज पाचरणे व सह वनक्षेत्रपाल गणेश मिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच अधिकारी यांना त्यांनी धारेवर धरले.
मयत शोभचंद गव्हाणे यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते वडनेर सोसायटीचे चेअरमन किरण चव्हाण यांचे चुलते होत. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बिबट्याने मानवी हल्ला केल्याने तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत असल्याने वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. येथ पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली. मात्र वनविभागाने दुर्लक्ष केले असे ग्रामस्थांनी सांगितले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष –
गेल्या अनेक दिवसांपासून वडनेरसह पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर होता. अनेक वेळा ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले होते. शेतकरी बांधवही रात्रीच्या वेळी काम करण्यास घाबरत होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना महिन्याभरापासून पिंजरा लावण्यासाठी नागरिकांनी मागणी केली होती. मात्र याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मंत्र्यांच्या बंगल्यात बिबट्या सोडा : माजी मंत्री तनपुरे
राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याच्या संचार वाढला आहे. खरं तर मंत्र्यांच्या बंगल्यात बिबट्या सोडले पाहिजे. जोपर्यंत बिबट्याबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत मृत गव्हाणे यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा आक्रमक पावित्रा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला आहे.





