राहुरीत अतिवृष्टीचा कहर: शेतकरी, नागरिकांचे मोठे नुकसान

राहुरी : राहुरी तालुक्याला अतिवृष्टीने जोरदार तडाखा दिला असून खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांनी हेक्टरी साठ हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस रविवारी सकाळी सातपर्यंत कोसळत होता. यामुळे राहुरी व परिसरात सखल भागातील झोपडपट्ट्या, घरांमध्ये पाणी शिरले.
देवनदी, करपरा, मुळा व प्रवरा नद्यांना पूर आला असून ओढे-नाले तुडुंब भरले. तांदूळवाडी, कोंढवड गावांचा संपर्क तुटला. टाकळीमियाच्या मोरवाडीत पाणी शिरल्याने दहा कुटुंबांना शेतकरी संघटनेचे रवी मोरे यांनी शाळेत हलविले. शिलेगांव येथील मुळा नदीकाठच्या कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केले.
शेतांमध्ये चार-पाच फूट पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली. पिंपरी अवघड, ब्राह्मणी, बारागाव नांदूर, मानोरी, सात्रळ, कोल्हार आदी गावांत पिकांचे मोठे नुकसान झाले. शेलगांव येथील संजय महाराज म्हसे यांचे कपाशी पीक वाहून गेले. राहुरी शहरातील पिंपळाचा मळा, जुना कनगर रोड, वाघाचा आखाडा, सातभाई मळा येथील कांदा चाळी, गोठे, चारा व जनावरांचे नुकसान झाले.
शेतकरी शीतल तनपुरे यांनी तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली. लोहार गल्लीतील सुनील राऊत यांच्या घराची, दुकानाची पडझड झाली. मठ गल्लीत झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तलाठी सोपान बाचकर यांनी ६५ मिमी पावसाची नोंद सांगितली. नगरपरिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम कार्यरत असून, पंचनामे तातडीने होणार आहेत.





