Maharashtra By-Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. काही दिवसांपूर्वी शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने अधिकृतपणे पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आमची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र जर निवडणूक लादली गेली, तर आम्हीही ती लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. राहुरी मतदारसंघात येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील भाजपकडे ही जागा असल्याने पक्षाकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावाचा संभाव्य उमेदवार म्हणून विचार केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार संग्राम जगताप यांनीही प्रतिक्रिया देताना भाजपकडून अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी मिळेल आणि ते निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, अक्षय कर्डिले यांनीही निवडणुकीसाठी तयारी दर्शवली आहे. गेल्या तीस वर्षांपासून मतदारांनी दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांना दिलेला पाठिंबा यावेळीही कायम राहील आणि राहुरीतील मतदार आपल्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.