नवी दिल्ली : नेतृत्वाचा अभाव या मुद्द्यावरून कॉंग्रेसजनांकडून वेगवेगळी भूमिका मांडली जात असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. कॉंग्रेसमधील अनेकांना पक्षाध्यक्ष म्हणून राहुल यांचे कमबॅक हवं असल्याचं खुर्शिद यांनी म्हटले आहे.
राहुल हे कॉंग्रेसचे प्रमुख नेते आहेत. कॉंग्रेसचे प्रतिस्पर्धी पक्ष सर्वांधिक राहुल यांनाच लक्ष्य करतात. त्यातूनही तेच आमचे प्रमुख नेते असल्याचे स्पष्ट होते. आम्ही त्यांना नेते म्हणून स्वीकारले आहे. मात्र, आमची मते आम्ही त्यांच्यावर का लादावीत? पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यासंबंधी निर्णय घेण्याचा आणि वेळ ठरवण्याचा अधिकार त्यांना दिला जावा, असे खुर्शिद पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाचा कुठलाही पेच नाही. सोनिया गांधी पक्षाची धुरा सांभाळत आहेत, असेही त्यांनी म्हटले. मागील वर्षी ऑगस्टमध्ये कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनियांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे कॉंग्रेसच्या नियमित अध्यक्षाची नियुक्ती केव्हा होणार हा मुद्दा सातत्याने चर्चेचा विषय बनत असतो. आता कॉंग्रेसमध्येच त्यावरून अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.