राहुल अमेठी सोडणार?

– हेमचंद्र फडके 

देशाच्या राजकारणात ज्येष्ठ-दिग्गज नेत्यांकडून लोकसभा-विधानसभा निवडणुकांमधध्ये दोन जागा लढवणे ही गोष्ट आता नवी राहिलेली नाही. दोनहून अधिक जागांवर निवडणूक लढवता येणार नाही, अशी तरतूद कायद्यामध्ये येण्यापूर्वी तर अनेक नेते तीन तीन जागांवरही उभे राहिलेले होते. विशेष म्हणजे दोन्ही जागांवर विजय झाल्यानंतर बहुतांश उमेदवारांनी आपल्या पारंपरिक आणि भक्‍कम मानल्या जाणाऱ्या जागेवरील दावा सोडला. अशा स्थितीत आता कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी दोन्ही ठिकाणांहून विजय मिळवल्यास ते वायनाडसाठी अमेठी सोडतील का? सामान्यतः, दोन्ही जागी निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाकडून चाचपणी केली जाते. यामध्ये कोणत्या जागेवर दुसरा उमेदवार उभा केल्यास सहजगत्या निवडून येऊ शकतो याचा अंदाज घेतला जातो. यामध्ये साहजिकच नेते नव्याने जिंकलेला मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याला प्राधान्य देतात. याचे कारण पारंपरिक जागेवर पोट निवडणुका झाल्या तरी तिथे आपल्यावतीने दुसरा चेहरा सहजगत्या जिंकून येऊ शकतो. काही वेळा दुसऱ्या राज्यामध्ये पक्षाचा विस्तार करण्याच्या उद्देशानेही आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून जिंकलेल्या नव्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आजवरची ही परंपरा किंवा प्रवाह पाहिल्यास राहुल गांधी काय करणार याची सध्या चर्चा सुरू आहे.

1980 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींनी रायबरेली या आपल्या हक्‍काच्या आणि भक्‍कम मतदारसंघाबरोबरच कर्नाटकातील मेडक लोकसभा मतदारसंघातून निवडणूूक लढवली होती. दोन्ही जागी विजय झाल्यानंतर त्यांनी रायबरेली मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकांमध्ये अरुण नेहरूंना विजयी करून दिले.

1991 मध्ये भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी नवी दिल्लीबरोबरच गांधीनगरमधून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजय मिळाल्यानंतर आडवाणींनी नवी दिल्लीची जागा सोडून दिली. परंतु यानंतर या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसचे उमेदवार राजेश खन्ना यांनी पराभव केला.

2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि बडोदा अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्हीही ठिकाणी विजय मिळाल्यानंतर मोदींनी आपला हक्‍काचा आणि पारंपरिक मतदारसंघ असलेला बडोदा दुसऱ्या उमेदवारासाठी सोडला आणि वाराणसीचे खासदार म्हणून कार्यरत राहिले. अशाच प्रकारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनीही मैनपुरी आणि आझमगड अशा दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली. दोन्ही ठिकाणी विजय मिळाल्यानंतर मुलायमसिंहांनी मैनपुरीची जागा सोडली. पोटनिवडणुकांमध्य तिथे समाजवादी पक्षाचाच दुसरा उमेदवार विजयी झाला. 2009 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या अखिलेश यादव यांनी फिरोजाबाद आणि कन्नौज या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. दोन्ही ठिकाणी जिंकल्यानंतर त्यांनी भक्‍कम स्थिती असलेली फिरोजाबादची जागा सोडली.

अटल-सोनियांचा वेगळा पायंडा
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दुसऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये लखनौ, मथुरा आणि बलरामपूर अशा तीन मतदारसंघातून निवडणूक लढवली. यापैकी केवळ बलरामपूरमधूनच वाजपेयी जिंकले. देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील मतदारसंघातून निवडणूक जिंकणाऱ्या अटलजींनी या पराभवानंतर लखनौला आपली कर्मभूमी बनवली.

अशाच प्रकारे 1999 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अमेठीबरोबरच बेल्लारीमधूनही विजय मिळवला. मात्र सोनियांनी बेल्लारीमधील जागेचा राजीनामा दिला आणि अमेठी या आपल्या पारंपरिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधी यांना राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी सोनियांनी पुढे अमेठीऐवजी इंदिरा गांधींची पारंपरिक जागा असणाऱ्या रायबरेलीला आपली कर्मभूमी बनवले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.