शेवाळेवाडी गावाला महापालिकेने बंद नळांद्वारे पाणीपुरवठा करावा, राहुल शेवाळे यांची मागणी

मांजरी (पुणे) – महापालिकेत समाविष्ठ असलेल्या शेवाळेवाडी गावाला बंद नळाने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली आहे. महापालिका पाणी पुरवठा अधिकारी अनिरुद्ध पावसकर, इंद्रभान रणदिवे ,सुभाष पावरा यांना तसे निवेदन देण्यात आले आहे.
भैरोबा पंपिंग स्टेशन मधील मैला मिश्रित पाणी या परिसरात सोडले जायचे, त्यामुळे येथील विहरी व बोअर वेलचे पाणी दूषित होत असल्याने शेवाळेवाडी गावाला 1965 सालापासून पुणे महानगरपालिके कडून पाणी पुरवठा केला जात होता. काही काळानंतर शहराची लोकसंख्या वाढत गेली आणि पाणी उशिरा व कमी दाबाने यायला लागले. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने वीहरी खोदून त्याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला गेला.
परंतु, काही वर्षांपूर्वी पुणे मनपा ने मुंढवा जॅकवेलचे दूषित पाणी जुन्या मूळा-मुठा कॅनॉलमधे सोडल्याने या परिसरातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे दूषित झाले होते. त्यामुळे महापालिकेने गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. परंतु टँकर द्वारे होणारा पाणी पुरवठा हा धोकादायक असून पाणी चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आणून दिले जात आहे.शिवाय टँकरचे पाणी बऱ्याचदा खराब येते व त्याची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.
यासाठी शेवाळेवाडी गावाला पूर्वी पासूनचा ( 1965 ) साली सुरू केलेला व आता बंद असणारा पाणी पुरवठा पुन्हा नव्याने सुरू करावा. अशी मागणी राहुल शेवाळे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की येथील सगळ्या बाबी तपासण्यासाठी अभियंत्यांना सांगितल्या आहेत.
“सन 1965 साली पासून गावाला बंद नळाने पालिकेचे पाणी येत होते. दरम्यान ते बंद करण्यात आले. वारंवार मागणी केल्यानंतर टँकरने अल्प व विस्कळीत ,अस्वच्छ पाणी पुरवठा केला जातो आहे. यातही पाण्याचे टॅंकर परस्पर दुसरीकडे नेले जातात. पाणी दूषित असते. मागणी पेक्षा कमी आणि अनियमित टॅंकर येतात. त्यामुळे महापालिकेने सन 1965 ला ज्याप्रकारे बंद नळाने पाणी पुरवठा केला होता, तसाच आता सुरू करावा. काही जुन्या पाण्याच्या लाईनही येथे आहेत. त्याला जास्त दाबाने पाणी द्यावे तसेच गावातही असलेल्या लाईनला पाणी देवून बंद नळाने पाणी द्यावे.” – राहुल शेवाळे (उपाध्यक्ष- भारतीय जनता पक्ष, पुणे जिल्हा)





