नवी दिल्लीे: भाजपचे नेते अमित शहा यांनी बिहारमध्ये जी प्रचारसभा घेतली त्यात त्यांनी अमेरिका आणि इस्त्रायल नंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य केवळ मोदींच्या नेतृत्वाखालील भारताला प्राप्त झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याची कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. सध्या चीनी लष्कराने भारतीय हद्दीत अतिक्रमण केले आहे. असे असताना अमित शहा यांनी जो दावा केला आहे त्यासंबधात राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की, सीमेवरील हकिकत सर्वांना माहिती आहे. लेकिन दिल खुश रखने के लिये शाह-यद हे खयाल अच्छा आहे अशा शेलक्या शब्दात त्यांनी अमित शहा यांच्या दाव्याची खिल्ली उडवली. चीन सीमेवर नेमके काय चालले आहे हे मोदी सरकारने स्पष्ट करावे आणि जनतेला नेमकी माहिती द्यावी अशी मागणी कॉंग्रेस व राहुल गांधी यांनी वारंवार केली आहे. चीनने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी मोदी सरकारने लपवून ठेवली आहे असेही कॉंग्रेसने सूचित केले आहे. असे असतानाही सीमा संरक्षणाची मोदी सरकारची मोठी क्षमता असल्याचा दावा अमित शहा यांनी केल्यामुळे राहुल यांनी ही संधी साधत त्यांच्यावर हा निशाणा साधला आहे.