मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या मुखपत्र ‘सामना’ने महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांची हकालपट्टी होणार असल्याचा सनसनाटी दावा केला आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद, तर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल नार्वेकर यांनी माध्यमांतील बातम्यांवर विश्वास नसल्याचं सांगत पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी स्वीकारण्यास तयार आहे. पक्षाची इच्छा हीच माझी इच्छा आहे. मंत्र्यांच्या हकालपट्टीबाबत विचारलं असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया देत, सर्वजण चांगलं काम करत आहेत, पण पक्षाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, असं मत व्यक्त केलं. मंत्रिपद मिळण्याबाबत विचारलं असता, नार्वेकर म्हणाले, मला जी जबाबदारी मिळेल, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. विधानसभा अध्यक्ष असो वा मंत्री, माझं काम जनतेच्या हितासाठी आहे, असं नार्वेकर म्हणाले. राहुल नार्वेकर यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा गौरव करताना सांगितलं की, मी क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. अधिवेशनात 152 लक्षवेधी मांडण्यात आल्या. मी माझ्या कामावर समाधानी आहे. मंत्रिपदाची संधी मिळाली, तर तीही पार पाडेन, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ‘सामना’चा दावा काय? ‘सामना’ने दावा केला आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात मोठं ‘धक्कातंत्र’ राबवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदम, नरहरी झिरवळ, नितेश राणे, जयकुमार गोरे, भरत गोगावले आणि दादा भुसे या आठ मंत्र्यांची हकालपट्टी होऊ शकते. याशिवाय, राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद, तर सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद देण्याची शक्यता आहे. मुनगंटीवार यांनी अलीकडेच सरकारविरोधात काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांना विधानसभा अध्यक्षपद देऊन समेट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असं ‘सामना’चं म्हणणं आहे.