आमदार अपात्रतेच्या सुनावणीआधी राहुल नार्वेकर दिल्लीकडे रवाना; कोणाची घेणार भेट?

Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचे प्रकरण मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. यावर आता महत्त्वाची सुनावणी उद्या पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी ते दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता (Tushar Mehta) यांची भेट घेणार आहेत.
आमदार अपात्रताप्रकरणी 30 ऑक्टोबरपर्यंत नवे वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्याअनुषंगाने दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुनावणीच्या नव्या वेळापत्रकाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
दिल्लीत जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, “आमदार अपात्रतेबाबत दिल्लीत महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहे. हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे. राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना नोटीस ही अपात्रतेबाबतची प्रक्रिया आहे. याबाबत छाननी झाली असून नोटीसा दिलेल्या आहेत वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे. तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन.”
कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना कठोर शब्दांत फटकारले
विधानसभा आमदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीस जाणीवपूर्वक विलंब होत असल्याने सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना दोन वेळा अत्यंत कठोर शब्दांत फटकारलं आहे. या सुनावणीचे वेळापत्रक 30 ऑक्टोबरला सादर करण्याचे आदेश दिले आहेत आणि दोन महिन्यात निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक सादर करणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.





