नेवासा – नेवासा तालुक्यातील गेवराई गावचे सुपुत्र राहुल कर्डिले यांनी नुकताच नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्याने त्यांच्या गेवराई गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कर्डिले यांचे ध्येय यूपीएससी पास होण्याचे हाेते. मात्र दरम्यानच्या काळात त्यांनी एमपीएससीही परीक्षा दिली. त्यात सहकार विभागाची जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) परीक्षा उत्तीर्ण झाले. तरीही ते पुढच्या ध्येयापासून हटले नाहीत. यूपीएससीच्या चौथ्या प्रयत्नात अखेर त्यांनी यशाला गवसणी घातली. जिल्हाधिकारी राहुल यांचे वडील काशिनाथ कर्डिले रयत शिक्षण संस्थेत शिक्षक आहेत. त्यामुळे राहुल यांचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाथर्डी, नाशिक जिल्ह्यात सिन्नर अशा ठिकाणी, तर इंजिनियरिंग नगरच्या विळद घाटातील विखे पाटील फाउंडेशनमध्ये झाले. त्यानंतर राहुल यांनी यूपीएससीचे ध्येय बाळगले. २०१५ मध्ये त्यांना या परीक्षेत यश मिळाले. कर्डिले यांनी गुरुवारी नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी पदभार हाती घेतला. राहुल यांचे चुलत बंधू विकास कर्डिले यांचीही गेल्या वर्षी उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. नेवासा तालुक्यातील अधिकारी ठाणे पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या कार्याचे कौतुक केले. यापूर्वी वर्धा जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केलेली कामगिरी भारतीय प्रशासकीय सेवेत उठावदार ठरली. ई-ऑफिस, सेवादूत, मिशन मॅजिस्ट्रेट यासह बीबीएफ अशा उपक्रमातून त्यांनी शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली. वर्धा सारख्या जिल्ह्यात स्ट्रॉबेरी, रेशीम शेतीसाठी त्यांनी प्रोत्साहन देत कृषी सल्ला दिला. अधिक पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात निचऱ्यांच्या शेतजमिनीसाठी घेतलेल्या उपक्रमातून दीडपट शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. दोन हजारापर्यंत हेक्टरचे शेती क्षेत्र वीस हजारापर्यंत गेले. शेतीपूरक उद्याेगासाठी शेतकऱ्यांना बँकाचा आर्थिक आधार मिळण्यासाठीही त्यांनी एक खिडकी उपक्रम राबवला. सरकारच्या जनहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहाेचविल्या आहेत.