राहुल गांधी यांचा राजकीय भाव वधारला! विरोधी पक्षांमधील प्रमुख चेहरा म्हणून उदय

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज वयाची ५४ वर्षे पूर्ण केली. त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त केवळ स्वपक्षातूनच नव्हे; तर इतर पक्षांमधूनही शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला. त्यातून राहुल यांचा राजकीय भाव वधारल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांमधील प्रमुख चेहरा म्हणून त्यांचा निर्विवाद उदय झाला आहे.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने लक्षणीय कामगिरी केली. त्यामध्ये कॉंग्रेसचे योगदान उल्लेखनीय ठरले. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांत (वर्ष २०१४ आणि २०१९) नामुष्कीजनक पीछेहाट झाल्याने तो पक्ष लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यास पात्र ठरू शकला नाही. यावेळी त्या नाचक्कीचा शिक्का कॉंग्रेसने पुसला आहे. राहुल यांनीच विरोधी पक्षनेता बनावे असा जोरदार आग्रह पक्षातून होत आहे.





