राजकारण : वरुण गांधींसाठी दारे बंद

राहुल गांधी यांनी वरुण गांधी यांचा मार्ग भिन्न असल्याचे सांगत त्यांच्यासाठी कॉंग्रेसची दारे बंद असल्याचेही संकेत दिले आहे. त्याबाबत…
देशातील काही राजकीय घराण्यांबद्दल आदराची भावना आहे. त्या कुटुंबातील सदस्यांबद्दल एक प्रकारची आपुलकी आणि प्रेम आहे. महाराष्ट्रात जसे ठाकरे घराणे, पवार घराणे आहे तसेच देशात गांधी घराण्याबद्दल तशी भावना आणि कुतूहल आहे. पण याच घराण्यांतील दोन व्यक्ती जर वेगवेगळ्या विचारधारांचे प्रतिनिधित्व करत असतील, तर अनेकांना विनाकारण चुकल्यासारखे होते. त्यांनी एकत्र यावे अशी इच्छा असते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबत अशा चर्चा झडत असतात. तशाच चर्चा राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्याबाबतही घडतात. ठाकरे बंधूंचे जसे नाते आहे तसेच नाते गांधी बंधूंचे आहे. लोकांना वाटते त्यांनी एकत्र यावे. काही वेळा टाळी देण्याचा प्रयत्न होतोही. मात्र शेवटी टाळी एका हाताने वाजत नसते. दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तरच मनोमिलन होते. अन्यथा दारे बंद होतात. जशी आता वरुण यांच्यासाठी झाली आहेत.
राहुल गांधी यांनी वरुण यांच्यासाठी कॉंग्रेसची दारे बंद केली आहेत का, असा प्रश्न आता विचारला जातो आहे. त्याचे कारण भारत जोडण्यासाठी राहुल पदयात्रा करत असताना त्यांनी आपल्याच घरातील व्यक्तीला पुन्हा पक्षाशी जोडण्याबाबत अप्रत्यक्षपणे मात्र थेट नकारच दिला आहे. पंजाबमध्ये असताना त्यांना वरुण गांधी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्याला राहुल यांनी जे उत्तर दिले त्यावरून क्वचितच कोणाला वाटू शकेल की, राहुल हे वरुण यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.
राहुल म्हणाले की, वरुण भारतीय जनता पार्टीत आहेत. ते माझ्यासोबत भारत जोडो यात्रेत चालले तर त्यांनाच अडचण निर्माण होऊ शकते. तसेच माझी आणि त्यांची विचारधारा भिन्न आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊ शकत नाही. त्यापूर्वी अगोदर मला स्वत:चे सर कलम करावे लागेल. माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे आणि वरुण यांनी वेगळी विचारधारा स्वीकारली आहे. त्या विचारधारेचा म्हणजे संघ- भाजपच्या विचारधारेचा मी स्वीकारू शकत नाही. राहुल यांचा, त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि एकूणच कॉंग्रेस पक्षाचा संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला विरोध आहे. तो इतिहास आणि वर्तमानही आहे आणि सगळ्यांना ज्ञात आहे. सोनिया यांनी भाजप, संघावर टीका करताना एवढी प्रखरता दाखवली नसेल, मात्र राहुल दिवसातून एकदा तरी संघावर निशाणा साधत असतात. त्या अनुषंगाने विचार केला, तर वरुण त्या विचारधारेचे प्रतिनिधी असल्याचे राहुल जर म्हणत असतील तर त्यांनी वरुण यांच्यासाठी दारे बंदच केली आहेत हे स्पष्ट होते.
वरुण यांच्या मातोश्री मनेका गांधी यांनी वरुण दोन वर्षांचे असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे घर सोडले होते. नंतर त्या राजकारणात सक्रिय राहिल्या व त्यांचा प्रवास भाजपाशी येऊन थांबला. त्यांना भाजपने केंद्रात मंत्रिपदही दिले. नंतर वरुण यांनाही पक्षाने खासदारकीची संधी दिली. थोडक्यात, गांधी कुटुंब ज्या विचारधारेला मानतो ती विचारधारा वरुण दोन वर्षांचे असतानाच त्यांच्यापासून लांब गेली होती. सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे वरुण भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांची एक आक्रमक नेता, जहाल नेता अशी प्रतिमा तयार झाली किंवा केली गेली.
गांधी कुटुंबातीलच एक वारस ते कुटुंब ज्या विचारधारेच्या विरोधात बोलत असते, नेमकं त्याच विचारधारेचे जोरकसपणे समर्थन करतो आहे, असा संदेश पद्धतशीरपणे दिला गेला. त्याद्वारे वरुण काही काळ स्टारही झाले आणि गळ्यातले ताईतही बनले. पण मुळातच विभिन्न गुणधर्म असलेले लोक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. तो डीएनएचाही भाग असतो. राजकीय भविष्याचा विचार करून काही निर्णय वरुण यांनी त्यांच्या मातोश्रींच्या सल्ल्याने घेतलेही असतील, तथापि त्यांचा भाजपकडूनच अपेक्षाभंग झाल्याची विधाने गेल्या तीन वर्षांपासून ते सातत्याने करत आहेत. सध्यातरी त्यांची दिल्लीची महत्त्वाकांक्षा नाही. तूर्त त्यांचे उत्तर प्रदेशबाबत काही अडाखे होते. योगी आदित्यनाथ यांचा सूर्य सध्या त्या राज्यात चमकत असल्यामुळे वरुण यांच्या राजकीय आशा धुळीस मिळाल्या. त्यांनी अगोदर उत्तर प्रदेश सरकार, नंतर योगी, करोना काळातील ढिसाळ कारभार आणि शेवटी थेट भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतील नेतृत्वावर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली.
सध्या ते शरीराने भाजपमध्ये आहेत, मन मात्र तेथून अगोदरच बाहेर पडले आहे. ते जरी पडले नसतील तरी भाजपने त्यांना बाजूला कधीच टाकले आहे. तीच अवस्था त्यांच्या मातोश्रींचीही आहे. जरी गांधी कुटुंबातून हे दोघे बाहेर पडले असले, तरी त्या कुटुंबाला देशात आणि परदेशात जे वलय प्राप्त आहे त्यातून ते बाहेर पडले नाहीत आणि पडूही शकत नाही. भारतात ते कायम चर्चेत राहणार, पण त्याचवेळी आपण एखाद्या फुटकळ प्रादेशिक पक्षापेक्षा राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचा भाग असावे अशीच त्यांची अपेक्षा आणि गरजही असणार. भाजपची दारे जर त्यांनी बंद केली किंवा करवून घेतली असली तर त्यांच्यासमोर कॉंग्रेस हा एकमेव पर्याय राहतो. तशी चाचपणी म्हणूनच वरुरण यांनी करून पाहिली होती.
भाजपच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका त्यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. आज हिंदूंना मुस्लिमांशी आणि मुस्लिमांना हिंदूंशी लढवण्यासाठी राजकारण केले जात असल्याचे कोणता नामोल्लेख न करता ते म्हणाले होते. कधी काळी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वाचा विरोध करणारे वरुण आता गांधींबद्दल किंवा नेहरूंबद्दलही काही बोलत नाहीत.
त्यांनी कॉंग्रेसच्या दिशेने आपले पाऊल पडत असल्याचे हे सूचितच केले होते. पण राहुल यांनी परतीचे दोरच कापले. या त्यांच्या भूमिकेमागचे दुसरे कारण असे की, कॉंग्रेसने दिल्लीला पोहोचण्यासाठी पुन्हा उत्तर प्रदेशपासून सुरुवात केली आहे.
सध्या या राज्याची जबाबदारी राहुल यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. वरुण यांना दिल्लीत आताच्या स्थितीत स्वारस्य नाही आणि उत्तर प्रदेशात त्यांना वाटेकरू म्हणून आणण्यात कॉंग्रेसला स्वारस्य नसावे.





