नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौ-यांवरून देशातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौ-यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. परदेश दौ-यांदरम्यान राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत ठेवली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौ-यांवरून भाजपाकडून करण्यात येणारे आरोप फेटाळून लावले. तसेच परदेश दौ-यांदरम्यान भारतीय दूतावासामधील लोक राहुल गांधींवर पाळत ठेवून असतात. तसेच अनेक परदेशी नेत्यांना राहुल गांधी यांची भेट घेऊ नका, असे सांगितले जाते, असा आरोप पित्रोदा यांनी केला. पित्रोदा म्हणाले, आता परदेश दौरे हे अचानक होत नाहीत. तर अनेक महिन्यांपूर्वी त्यांचे नियोजन केले जाते. जर्मन दौ-याचा मुख्य हेतू हा पुरोगामी आघाडीची बैठक होता. त्यात सुमारे ११० देशातील पुरोगामी पक्ष सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधींवर परदेशात जाऊन भारतविरोधी वक्तव्ये करत असल्याच्या होणा-या आरोपांबाबत सॅम पित्रोदा यांनी परखड शब्दात प्रत्युत्तर दिले. आजच्या काळात तुम्ही भारतामध्ये जे काही बोलता ते जगभरात पसरते आणि जे बाहेर बोलता ते देशात पसरते. खरंतर तुम्हा देशात बोला अगर परदेशात बोला, सत्य हे सत्यच असते, असा टोलाही त्यांनी लगावला. जर काँग्रेसला संस्थांवर कब्जा होत आहे, प्रसारमाध्यमे पक्षपात करत आहेत, सिव्हिल सोसायटीला कमकुवत केले जात आहे असे वाटत असेल तर ही बाब देशातही सांगितली जाईल आणि परदेशातही सांगितली जाईल, असेही त्यांनी सांगितले.