कोल्हापूर – काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्या शुक्रवारी कोल्हापूरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनालाही ते उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली. 5 ऑक्टोबर रोजी खासदार राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा होणार असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.