नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी 152 मतांनी विजय मिळवला आहे. इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा एनडीएकडून केला जात आहे. इंडिया आघाडीकडे 315 मते असताना त्यांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना केवळ 300 मते मिळाली. या निकालानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींनी वोट चोरी वरून लगावला टोला उपराष्ट्रपती निवडणुकीनंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली दौऱ्यावर गेले. या दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईबाबत बिहारमधील एका कार्यकर्त्याच्या वक्तव्यावर माफी मागण्याची मागणी केली. यावेळी मीडियाशी बोलताना राहुल गांधींनी उपराष्ट्रपती निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगवर भाष्य केले.“वोट चोर, गद्दी छोड,” असे त्यांनी चार शब्दांत सांगितले. मतचोरी झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी “शंभर टक्के” असे ठामपणे उत्तर दिले आणि ही मतचोरी देशभरात, विशेषतः उत्तर प्रदेशात होत असल्याचा आरोप केला. भाजपचा पलटवार राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला म्हणाले, “मतचोरी माहिती नाही, पण काँग्रेस नेत्यांचा मेंदू चोरीला गेला आहे का? उपराष्ट्रपती निवडणुकीत सद्सद्विवेकबुध्दीने मतदान करणाऱ्यांना ते मतचोरी म्हणत आहेत. राहुल गांधींचा हा प्रपोगंडा कधी थांबणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंडिया आघाडीत फूट? शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे मान्य केले, परंतु ही मते महाराष्ट्रातील नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, एनडीएच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केल्याचा दावा केला आहे.या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून, क्रॉस व्होटिंगच्या आरोपांमुळे इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.