रायबरेली : केंद्र सरकारने मनरेगा योजनेचे नाव बदलून त्या योजनेचा अपमान केला आहे. त्यांनी वंचित घटकांना मिळणारी सुरक्षा काढून घेतली आहे, हा लोकशाहीच्या मुळांवर हल्ला आहे. पंतप्रधानांना देशाची संपत्ती उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या हातात केंद्रित करायची आहे. त्यामुळेच मनरेगा योजनेचा बळी देण्यात आला, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. आपला संसदीय मतदारसंघ असलेल्या रायबरेलीच्या दौऱ्यादरम्यान पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहूल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्ता केंद्रीकृत केली असून गरिबांसाठीच्या कल्याणकारी सुरक्षा उपायांना त्यांनी कमकुवत केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायच्याचे (मनरेगा) नाव बदलण्याचीही गरज नव्हती. त्यामुळेच आता काँग्रेस मनरेगाचे संरक्षण करण्यासाठी देशव्यापी आंदोलन चालवत आहे. आम्ही मजुरांसोबत आहोत आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. एकीकडे आम्ही लोकांचे संरक्षण करत आहोत, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी देशाची संपूर्ण संपत्ती काही निवडक लोकांकडे वळवत आहेत, असा दावा करुन राहूल गांधी पुढे म्हणाले की, सध्याचे केंद्र सरकार खासगीकरणाला जास्त प्रोत्साहन देत आहे. त्याचे अनेक वाईट परिणाम देशाला भोगावे लागत आहेत.