राहुल गांधींनी आपशी आघाडी नाकारली – केजरीवाल

विशाखापट्टणम – दिल्लीतील सात जागांसाठी निवडणूक आघाडी करण्याचा प्रस्ताव आम आदमी पक्षाने कॉंग्रेसपुढे ठेवला होता. त्या संबंधात आपली राहुल गांधी यांच्याशी चर्चाही झाली पण या चर्चेत राहुल गांधी यांनीच आमच्याशी आघाडी करण्यास नकार दिला अशी माहिती आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिली.

आज येथील विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की आमच्यासाठी शीला दीक्षित या महत्वाच्या नेत्या नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी आघाडी बाबत चर्चाच केली नाही. आम्ही थेट राहुल गांधी यांच्याशीच बोललो पण त्यांनी आमच्याबरोबर आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिला असे ते म्हणाले.

कॉंग्रेसला दिल्लीत लोकसभा निवडणुकीपेक्षा सन 2020 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विशेष रस आहे. जर यावेळी आम आदमी पक्षाशी आघाडी केली तर विधानसभा निवडणुकींमध्ये आपण त्यांच्याशी कसे लढणार हा त्यांच्यापुढील प्रश्‍न असल्याने त्यांनी आघाडीला नकार दिल्याचे सांगण्यात येते. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा असून त्यात आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसची आघाडी झाली असती तर भाजपला येथे एकही जागा जिंकणे अवघड गेले असते असे आपच्या सूत्रांचे म्हणणे होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.