नवी दिल्ली : हरियाणाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदा असे झाले की, पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांचा कल वेगवेगळा होता. यापूर्वी पोस्टल बॅलेट आणि वास्तविक मतं यांची दिशा एकसारखीच असायची. निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत केले आणि ऑपरेशन सरकार चोरी सुरु झाली. या सरकार चोरीने देशातील लोकशाही नष्ट केली आहे, असा दावा कॉंग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. तसेच आता बिहारमध्येही मत चोरीची ही पद्धत राबविण्यात येणार असल्याचा त्यांनी आरोप केला. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी भवनात पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये एका युवतीचा फोटो दाखवला. या फोटोसह वेगवेगळ्या नावाने २२ ठिकाणी मतदान झाले. या युवतीने कुठे सीमा तर कुठे सरस्वती नावाने २२ वेळा मतदान केले, असा आरोप करत ब्राझीलची महिला हरियाणाच्या वोटर लिस्टमध्ये काय करत होती? असा सवाल त्यांनी विचारला.राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोग भाजपची उघडपणे मदत करत आहे. हरियाणातील एका बूथवर एका महिलेचे नाव २२३ वेळा होते. या महिलेने कितीवेळा मतदान केले? याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. फेक फोटो असलेले १ लाख २४ हजार १७७ मतदार होते. मतदार यादीत एका महिलेने नऊ जागी मतदान केले. या सर्व बाबींकडे निवडणूक आयोग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे. कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांनी हरियाणामध्ये सत्ताधारी पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी भाजपशी संगनमत केले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते भागीदारीत असल्याचा दावाही राहुल यांनी केला. हरियाणामध्ये दोन कोटी मतदार आहेत. मात्र २५ लाख मतांची चोरी झाली आहे. याचाच अर्थ आठ पैकी एक मतदार हा बनावट होता. त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला. तसेच निवडणुकीपूर्वी काँग्रेस समर्थकांची मते पद्धतशीरपणे हटवली जात असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.