अचानक लॉकडाऊन पुकारल्याने नागरिकांमध्ये घबराट – राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली – करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने अचानक जाहीर केलेल्या लॉकआऊटमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत व संभ्रम निर्माण झाला आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीलेल्या पत्रामध्ये राहुल गांधी यांनी गरीबांच्या दुर्दशेवर प्रकाशझोत टाकला आहे. काही विकसित देशांनी करोना विषाणूला नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊनची उपाय योजना केली आहे. मात्र आपण त्यापेक्षा वेगळी उपाय योजना करायला हवी, अशी अपेक्षाही राहुल गांधी यांनी व्यक्‍त केली आहे.

भारताची स्थिती अन्य देशांपेक्षा वेगळी आहे. विकसित देशांनी केलेल्या उपाय योजनांपेक्षा आपल्याला वेगळ्या उपाय योजना अवलंबाव्या लागतील. भारतातील अनेक गरीब रोजंदारीवर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी साथीचे कारण देऊन अनपेक्षितपणे सर्व आर्थिक व्यवहार बंद करणे ही बिकट स्थिती आहे. अशाप्रकारे संपूर्ण लॉकडाऊअ करण्याने करोनापेक्षा अधिक मृत्यू होतील, अशी भीतीही राहुल गांधींनी व्यक्‍त केली आहे.

कारखाने, लघु उद्योग आणि बांधकामे बंद आहेत. त्यामुळे हजारो परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्यासाठी अवघड प्रवास करावा लागतो आहे. या कामगारांना आणखी काही महिने आश्रय आणि थेट खात्यात पैसे जमा करून आपण मदत करायला पाहिजे. या लॉकडाऊनमुळे गावांकडे जाणाऱ्या कामगारांमुळे गावातील ज्येष्ठांनाही संसर्ग होण्याची शक्‍यता आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.