नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध प्रकारच्या अनियमितता घडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तो विषय सोमवारी लोकसभेत उपस्थित झाला. महाराष्ट्रात अवघ्या ५ महिन्यांत तब्बल ७० लाख मतदारांची नोंद झाली. ती वाढ जवळपास हिमाचल प्रदेश या राज्याच्या लोकसंख्येइतकी आहे. शिर्डीतील एकाच इमारतीच्या पत्त्यावर सुमारे ७ हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर लोकसभेत चर्चा सुरू झाली. त्यामध्ये सहभागी होत राहुल यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेच्या प्रामाणिकपणाविषयी साशंकता व्यक्त केली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत विरोधकांची सरशी झाली. तो निकाल मागील वर्षीच्या जूनमध्ये जाहीर झाला. त्यानंतर मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. त्या दोन निवडणुकांदरम्यान अचानकपणे मोठ्या संख्येने मतदारांची नोंद मतदारयाद्यांमध्ये झाली. संबंधित ५ महिन्यांत नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या ५ वर्षांत नोंदवल्या गेलेल्या मतदारांपेक्षा अधिक आहे. कुठला आरोप करण्याचा माझा हेतू नाही. हिमाचलच्या लोकसंख्येइतके मतदार महाराष्ट्रात वाढण्याची जादू घडली. ती बाब अनाकलनीय असल्याचे माझे म्हणणे आहे, असे त्यांनी नमूद केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवेळच्या महाराष्ट्रातील मतदारयाद्या उपलब्ध करण्याची विनंती आम्ही अनेकदा निवडणूक आयोगाला केली. भाजपचा विजय झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने नवे मतदार जोडले गेले आहेत. मी अद्यापही कुठला आरोप करत नाही. महाराष्ट्राची आकडेवारी निवडणूक आयोगाने कॉंग्रेस, ठाकरेसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाला द्यावी एवढीच माझी मागणी आहे. ती मिळाल्यास नेमके कुठे मतदार वाढले आणि कुठे कमी झाले याची छाननी करता येऊ शकेल. अर्थात, निवडणूक आयोग आकडेवारी उपलब्ध करणार नाही याची खात्री असल्याचा शाब्दिक टोलाही राहुल यांनी लगावला.