पाटणा : दिल्लीनंतर भाजपच्या काही नेत्यांनी बिहारमध्येही मतदान केले, असा सनसनाटी दावा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. मात्र, त्यांनी कुणाचा नामोल्लेख केला नाही. बिहारच्या बांकामधील प्रचारसभेत बोलताना राहुल यांनी कथित मतचोरीचा मुद्दा लावून धरला. भाजपच्या काही नेत्यांनी आधी दिल्लीत, तर आता बिहारमध्ये मतदानाचा हक्क बजावल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, अधिक तपशील दिला नाही. दिल्लीत चालू वर्षी फेब्रुवारीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. तर, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरूवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्याचा संदर्भ राहुल यांनी दिला. त्यांनी सातत्याने निवडणुकांमधील कथित अनियमितता आणि मतचोरीविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. राहुल यांनी नुकतीच दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मागील वर्षीच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतील कथित मतचोरी चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी विविध अनियमितता दर्शवणारे सादरीकरणही केले. हरियाणातील भाजपचे सरकार म्हणजे चोरीचे सरकार आहे. बिहारमध्येही तसेच घडवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला.