पुणे: १ जानेवारी रोजी होणाऱ्या ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये ४० टक्क्यांची वाढ करावी, अशी आग्रही मागणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली आहे. येरवडा येथील सामाजिक न्याय भवन येथे हवेली प्रांताधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती, आयोजक कार्यकर्ते आणि विविध संघटना प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डंबाळे यांनी शौर्यदिन सोहळ्यासाठीच्या सुविधा वाढवण्याची मागणी लावून धरली. २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी – डंबाळे यांनी यावेळी राज्य सरकारने २०२६ च्या शौर्यदिन कार्यक्रमासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी देखील मागणी केली. समितीने केलेल्या मागणीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी शौचालय, पिण्याचे पाणी, बसेस आणि पार्किंग व्यवस्था यांसारख्या सुविधांमध्ये सुमारे ४० टक्क्यांची वाढ करावी लागणार आहे. या मागणीला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती राहुल डंबाळे यांनी दिली. यावेळी डंबाळे यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण मागणी केली. विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा प्रत्यक्ष अंमलबजावणीस येण्यापूर्वी, तातडीची बाब म्हणून विजयस्तंभास भेट देणाऱ्या अनुयायांना वर्षभर मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणीही समन्वय समितीने केली आहे.