प्रभात वृत्तससेवा राहू – राहू ते नवले मळा या रस्त्यासाठी तब्बल 75 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. प्रशासकीय अनास्था आणि काही स्थानिक वादामुळे वर्षभरापासून रस्ता खोदून ठेवल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. या प्रकाराचा संताप व्यक्त करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून शासनाचा अनोखा निषेध केला आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. निधी मिळाल्यानंतर साधारण वर्षभरापूर्वी या कामाचा शुभारंभ झाला. त्यावेळी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उकरण्यात आला. मात्र, त्यानंतर काही स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे काम बंद पडले ते आजतागायत सुरू होऊ शकले नाही. परिणामी, खोदलेल्या रस्त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. रस्ता उखडलेल्या अवस्थेत असल्याने गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी, पालक आणि शेतकरी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी बोलताना सामाजिक अनेक कार्यकर्ते म्हणाले की, वर्षभरापासून रस्ता उखडलेला आहे. यामुळे शाळेत जाणारी मुले आणि मालवाहतूक करणार्या शेतकर्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. “लाखोंचा निधी पडून असूनही केवळ समन्वयाच्या अभावामुळे विकासकाम रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने तोडगा काढून रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी अनेक बैठका घेतल्या, पण तोडगा निघाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत.” -रामभाऊ सोनवणे, संस्थापक अध्यक्ष, मराठा युवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य