प्रभात वृत्तसेवा रहिमतपूर – नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत अजूनही संपली नसली तरी जवळपास सर्वच प्रभागात उमेदवारी निश्चित करून सुनील माने व वासुदेव माने यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याउलट भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढणारे नीलेश माने यांना स्वकीयांनीच घेरले असल्याचे चिन्ह रहिमतपूरमध्ये दिसत आहे .रहिमतपूर नगरपालिकेचे निवडणूक लागल्यानंतर रहिमतपूरमधील भाजप-शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित येत रहिमतपूर नगरपालिकेचे निवडणूक महायुती माध्यमातून लढवणार असे जाहीर केले होते. हे जाहीर करताना सौ. चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने व संपतराव माने ,निलेश माने व समर्थकांनी एकत्रित पत्रकार परिषदेत सामोरे गेले होते. महायुतीच्या माध्यमातून सुनील माने यांच्यासमोर नगरपालिकेसाठी कडवे आव्हान उभे राहील असे चित्र दिसत होते. निवडणूक एकत्रित लढवली जाणार यामुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह दुणावला होता. याच कालावधीत सुनील माने यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटातून अजितदादा गटात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशानंतर रहिमतपूरच्या राजकारणातील समीकरण बदलले. सुनील माने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजितदादा गटात प्रवेश केला असला तरी माजी नगराध्यक्ष अविनाश माने, सह्याद्रीचे संचालक रमेश माने यांनी शरद पवार गटातच राहणे पसंत केले. तरीही या दोन्ही गटांनी एकत्रित येत रहिमतपूरमध्ये उमेदवारांची निश्चिती जवळपास केली होती. त्यातच शिवसेनेत शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी प्रभागातील उमेदवारीवरून नाराज होते. त्यांनी सुनील माने यांच्याबरोबर युती केली .मिळालेल्या संधीचा फायदा घेत सुनील माने यांनीही वासुदेव माने यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना प्रभागातून उमेदवारी देत जवळपास प्रचाराला सुरुवात ही केली आहे. जवळपास सर्वच प्रभागात सुनील माने व वासुदेव माने म्हणतील तो शब्द म्हणून उमेदवारासहित कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. याउलट भाजप नेते नीलेश माने यांना मात्र स्व पक्षातील आणि मित्रमंडळींनी निवडणुकीच्या रिंगणात घेरल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारीवरून वासुदेव माने व महायुतीत चांगलेच बिनसले. वेळ आल्यानंतर बोलीन म्हणणाऱ्या वासुदेव माने यांनी महायुतीची साथ सोडत सुनील माने यांच्या राष्ट्रवादीबरोबर युती केली. भाजप महिला मोर्चा राज्य उपाध्यक्ष सौ. चित्रलेखा माने कदम गेले अनेक दिवस प्रचारातून दूर आहेत. भाजपमधूनच सर्वात जास्त बंडखोरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपमधूनच सर्वात जास्त बंडखोरी झाली. सौ. चित्रलेखा माने कदम यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. तर उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून नीलेश माने यांच्या काही समर्थकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत निलेश माने व सौ. चित्रलेखा माने कदम यांच्या दोन्ही गटातील बेरीज व अपक्षांचे मनधरणी करून अर्ज माघारी घेतल्यानंतरच निनीलेश माने यांच्या प्रचाराला वेग येणार आहे.