प्रभात वृत्तसेवा पुणे – कायद्याची व्यूहरचना, धडाडीचे नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती अशा त्रिसूत्रीच्या बळावर मुंबईच्या गुन्हेगारीस वेसण घालण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. डाटा, कृत्रिम बु्द्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे आज गुन्हेगारीचे रंगरूप बदलले आहे. त्यामुळे या नवीन शस्त्रांचा सामना करण्यासाठी पोलिसांना सज्ज राहावे लागणार आहे, असेही डॉ. माशेलकर यांनी सांगितले. ध्यास फाउंडेशनतर्फे निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदनलिखित द ब्रह्मास्त्र अनलीश्ड या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त पोलीस महासंचालक ए. व्ही. कृष्णन् आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. माधव सानप आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे या वेळी उपस्थित होते. सर्वांना काम देणारी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही गुन्हेगारीची राजधानी झाली होती. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले होते. सधन व्यक्ती घरातील लग्नकार्य, वाहन आणि गृह खरेदीदेखील मनमोकळेपणाने करू शकत नव्हते, एवढी पकड गुन्हेगारांनी मजबूत केली होती. मात्र, धाडसी, धैर्यशील आणि कणखर नेतृत्वानेच या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.मुंबईतील गुन्हेगारीसाठी कायद्याची जरब आवश्यक होती. मोक्का कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मुंबईतील गुन्हेगारीची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढली, असे कृष्णन यांनी सांगितले. ९० च्या काळात मुंबईत दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजनसारख्या गुन्हेगारांनी दहशतवादी हल्ले, खंडणी, खुनांच्या सत्राद्वारे दहशत निर्माण केली. एके-४७ सारख्या शस्त्रांद्वारे मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी कायद्याच्या चौकटीची वेसण घातल्याचे शिवानंदन यांनी नमूद केले. सानप यांनी प्रास्ताविक केले. स्मिता रंधवे यांनी सूत्रसंचालन केले. अक्षता कुलकर्णी यांनी आभार मानले.