Raghav Chadha: भाजपमध्ये प्रवेश करताच 24 तासाच्या आत राघव चड्ढांना बसला पहिला मोठा झटका; फाॅलोअर्स झपाट्याने घटले
Raghav Chadha: आता पक्षांतर केल्यामुळे त्यांची ही प्रतिमा आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचे दिसत आहे. डेटा आणि ट्रेंड्सच्या राजकारणाची सखोल समज असणारे राघव चड्ढा या कठीण परिस्थितीचा सामना कसा करतात आणि आपली जनमानसातील प्रतिमा पुन्हा कशी सावरतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raghav Chadha: देशाच्या राजकारणात सध्या एका मोठ्या घडामोडीने खळबळ माजवून दिली आहे. आम आदमी पार्टीमध्ये मोठी फूट पडली असून राज्यसभा खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह एकूण सात खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्व नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, या पक्षांतरामुळे राघव चड्ढा यांच्या लोकप्रियतेला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर त्यांच्या लोकप्रियतेत झालेली घट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये सुमारे १२ लाखांची घट –
राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये सुमारे १२ लाखांची घट झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, शुक्रवारी त्यांच्या फॉलोअर्सची संख्या १४.६ मिलियन इतकी होती, जी शनिवारी दुपारपर्यंत घटून १३.४ मिलियनवर आली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, या विरोधात तरुण वर्ग आणि प्रामुख्याने ‘जनरेशन झेड’ (Gen Z) आघाडीवर असल्याचे दिसत आहे. इंटरनेट ज्या वेगाने कोणाला हिरो बनवते, त्याच वेगाने खाली देखील खेचू शकते, हे या अनफॉलो मोहिमेवरून स्पष्ट झाले आहे.
उचलले होते सर्वसामान्यांचे मुद्दे –
राघव चड्ढा यांनी आत्तापर्यंत तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. राजकारणात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या दैनंदिन प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती. यामध्ये पितृत्व रजा, वाहतुकीच्या समस्या, टेलिकॉम कंपन्यांच्या डेटा मर्यादा आणि विमानतळांवरील महागड्या खाद्यपदार्थांचे दर अशा थेट सामान्य जनतेशी निगडित मुद्द्यांचा समावेश होता.
याशिवाय १० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमध्ये काम करणाऱ्या गिग वर्कर्सच्या शोषणाविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. स्वतः डिलिव्हरी पार्टनर बनून त्यांनी या कामगारांच्या समस्या समजून घेतल्या होत्या, ज्याचा परिणाम म्हणून केंद्र सरकारला डिलिव्हरी कंपन्यांसाठीची १० मिनिटांची सक्तीची वेळ हटवणे भाग पडले होते.
प्रतिमा आणि विश्वासार्हता धोक्यात –
पारंपारिक राजकारण आणि नव्या पिढीचा विचार यातील अंतर कमी करणारा नेता म्हणून चड्ढा यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आता पक्षांतर केल्यामुळे त्यांची ही प्रतिमा आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचे दिसत आहे. डेटा आणि ट्रेंड्सच्या राजकारणाची सखोल समज असणारे राघव चड्ढा या कठीण परिस्थितीचा सामना कसा करतात आणि आपली जनमानसातील प्रतिमा पुन्हा कशी सावरतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





