“घाणेरडं पाणी प्यायला लावलं… तासभर केली मारहाण” ; केरळमध्ये भयानक रॅगिंग, ७ सिनियर विद्यार्थी निलंबित

Ragging Case in Kerala । केरळमध्ये रॅगिंगचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. तिरुअनंतपुरममधील एका सरकारी महाविद्यालयात, सात वरिष्ठ विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला तासभर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यातच त्या विद्यार्थाला थुंकलेले पाणी पिण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कॉलेज प्रशासनाने सर्व सातही सिनियर विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल करून घेतला आहे.
हे प्रकरण तिरुअनंतपुरमच्या करियवट्टम सरकारी महाविद्यालयाशी संबंधित आहे. या महाविद्यालयाच्या अँटी-रॅगिंग सेलने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे. अहवालानंतरच सर्व सातही वरिष्ठांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सातही विद्यार्थी केरळच्या सत्ताधारी पक्ष ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष’चे विद्यार्थी शाखा ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’चे आहेत,
संपूर्ण प्रकरण काय आहे? Ragging Case in Kerala ।
११ फेब्रुवारी रोजी करिअवट्टम सरकारी महाविद्यालयात वरिष्ठ आणि ज्युनियर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये पहिल्या वर्षाचा एक विद्यार्थी जखमी झाला. त्याने वरिष्ठांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडे तक्रार केल्यामुळे वरिष्ठ अधिक संतापले. या वरिष्ठांनी तक्रार करणाऱ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याच्या वसतिगृहात प्रवेश केला आणि त्याचा शोध घेतला आणि जेव्हा तो सापडला नाही तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या विद्यार्थ्याला त्यांच्यासोबत नेले.
या विद्यार्थ्याला एसएफआयच्या अॅक्टिव्हिटी रूममध्ये आणण्यात आले. पीडित विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, त्याला गुडघ्यावर बसवण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. त्याला सुमारे एक तास मारहाण करण्यात आली. पीडित विद्यार्थ्याने असेही सांगितले की जेव्हा त्याने पिण्यासाठी पाणी मागितले तेव्हा त्याला थुंकलेले पाणी देण्यात आले. जेव्हा त्याने हे पाणी पिण्यास नकार दिला तेव्हा त्याला आणखी मारहाण करण्यात आली.
कॉलेज आणि पोलिसांची कारवाई Ragging Case in Kerala ।
कॉलेजच्या अँटी-रॅगिंग सेलने प्रकरण पोलिसांकडे सोपवण्यापूर्वी तक्रारीची सखोल चौकशी केली. त्यांनी कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली. जेव्हा त्यांन रॅगिंगचे स्पष्ट प्रकरण दिसले, तेव्हाच त्यांनी वरिष्ठांना निलंबित करण्याची कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी रॅगिंग प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्यायिक संहितेच्या अनेक वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.





