राधिका यादव हत्याकांडात मोठा खुलासा; ‘त्या’ रिलमुळे वडिलांनी झाडल्या गोळ्या

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राम येथील राधिका यादव हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडवली आहे. टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या पित्याने दीपक यादव याने गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे, ही घटना दीपक यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी घडली. राधिकाच्या टेनिस कारकीर्दीवर अडीच कोटी रुपये खर्च करणारा पिता अखेर आपल्या लाडक्या मुलीविरुद्ध इतका का भडकला, याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, राधिका आपली स्वप्ने पूर्ण करू इच्छित होती. तिने तिच्या पित्याला विश्वास देण्याचा प्रयत्न केला होता. “तूम्ही माझ्यावर अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत, मी ते वाया जाऊ देणार नाही. मी टेनिसमधील माझा अनुभव वापरून युवा खेळाडूंना प्रशिक्षण देईन,” असे ती पित्याला म्हणाली होती. मात्र, दीपक यादव यांनी गुरुग्राम येथील सुशांत लोक-२ येथील निवासस्थानी राधिकावर गोळ्या झाडून तिची हत्या केली.
सोशल मीडियावर रील बनवण्यावरून वाद –
राधिकाच्या बालपणापासून तिच्या टेनिस प्रशिक्षणावर दीपक यांनी अडीच कोटींहून अधिक रुपये खर्च केले होते. मात्र, दुखापतीमुळे राधिकाला तिची टेनिस कारकीर्द पुढे नेऊ शकली नाही. त्यानंतर तिने युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. सोबतच, ती सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर बनण्याच्या मार्गावर होती. एका वर्षापूर्वी तिने अभिनेता इनाम-उल-हक याच्यासोबत एक म्युझिक व्हिडिओदेखील केला होता आणि इन्स्टाग्रामवर रील्स बनवत होती.
पोलिस तपासातून समोर आले आहे की, राधिकाच्या सोशल मीडिया रील्समुळे दीपक यादव यांना ओळखीचे लोक टोमणे मारत होते. यामुळे ते प्रचंड नाराज होते. ते राधिकाला सतत अकादमी बंद करण्यास आणि सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगत होते. ते म्हणत, “आपल्या कुटुंबाला पैशाची कमतरता नाही.” दीपक यांच्या दबावामुळे राधिकाने काही काळापूर्वी तिची सर्व सोशल मीडिया खाती डिलीट केली होती. या साऱ्या तणावातूनच दीपक यांनी राधिकाची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दीपक यादव यांना पोलिसांनी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
इनाम-उल-हकचे स्पष्टीकरण –
या प्रकरणात अभिनेता इनाम-उल-हकने आपली बाजू मांडली आहे. एएनआयशी बोलताना तो म्हणाला, “राधिकाने फक्त एका म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगसाठी माझ्याशी संपर्क साधला होता. त्या कामासाठी तिला चांगले मानधन देण्यात आले. त्यानंतर आमचा कोणताही संपर्क झाला नाही. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.” राधिका यादव हत्याकांडाने गुरुग्रामसह संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत असून, याबाबत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

