Radhika Apte : प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे हिने अलीकडेच एका मुलाखतीत आपली पहिली फिल्म विसरू इच्छित असल्याचं सांगितलं आहे. राधिकाने २००५ साली आलेल्या ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती. राधिकाने सांगितलं की या चित्रपटाच्या वेळी प्रोड्यूसरने तिच्याशी योग्य वागणूक दिली नाही. तिला कामाचा मोबदला देण्यात आला नाही आणि करारावर सही करण्याबाबतही टाळाटाळ करण्यात आली. जेव्हा राधिका आणि तिच्या आईने कॉन्ट्रॅक्ट साइन करण्याबद्दल विचारलं, तेव्हा प्रोड्यूसरने “उर्मिला मातोंडकरनेही करार साइन केला नव्हता” असं उत्तर दिलं. या सगळ्या अनुभवामुळे त्या चित्रपटाचं प्रोडक्शन खूपच विचित्र वाटल्याचं राधिकाने सांगितलं. तसंच तिने स्पष्ट केलं की ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ हा चित्रपट ती आपल्या फिल्मी कारकिर्दीत मोजतही नाही. हा सिनेमा केल्यानंतर ती पुन्हा कॉलेज पूर्ण करण्यासाठी परत गेली आणि काही वर्षांनीच पुन्हा चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली. कामाच्या आघाडीवर पाहिलं तर, राधिका आपटे अलीकडेच ‘साली मोहब्बत’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती ‘रात अकेली है 2’ मध्ये झळकणार असून हा सिनेमा १९ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिची ‘अक्का’ ही वेब सिरीजही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.