पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर रणजितसिंह मोहित पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयसिंह मोहित पाटीलही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे 12 एप्रिल रोजी जाहीर सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत. तर 17 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुज येथील सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.
दरम्यान, राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिण नगर मतदारसंघातून आघाडीने तिकीट नाकारले होते त्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेत भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली. त्यानंतर वडील राधाकृष्ण विखे हेदेखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र आता मोदींच्या 12 एप्रिलच्या नगरमधील सभेत भाजपमध्ये विखे दाखल होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.