10 मे पर्यंत गाळ काढण्याचे काम पूर्ण करणार : प्रवीण गेडाम यांची माहिती
पुणे – एका बाजूला करोनाची दिवसेंदिवस पसरणारी साथ आणि दुसरीकडे दीड ते दोन महिन्यांवर आलेला पावसाळा यामध्ये महापालिकेने हातावर हात धरून बसण्यापेक्षा नालेसफाईला सुरुवात केली आहे. मागीलवर्षी पावसाळ्यातील परिस्थितीचा अनुभव घेतल्याने महापालिकेने हे काम हाती घेतले आहे. पालिकेच्या ड्रेनेज विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता प्रविण गेडाम यांनी याविषयी माहिती दिली.
मागीलवर्षी 25 सप्टेंबरला ढगफुटीमुळे आलेल्या पुरामध्ये पाच जणांसह काही जनावरे आणि कोट्यवधी रुपयांच्या नुकसानास कारणीभूत ठरलेल्या आंबिल ओढ्यातील गाळ काढण्याला प्रथम सुरुवात केली आहे. येत्या 10 मे पर्यंत संपूर्ण गाळ आणि राडारोडा काढण्याचे काम करण्याचे उद्दीष्ट असल्याचे गेडाम यांनी नमूद केले.
शहरातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. त्यात आता पावसाळा जवळ आला आहे. एव्हाना या कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन कामांना सुरुवातही होते. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे याला काही दिवस उशीर झाला आहे. शहरातील नाले आणि पावसाळी गटारे साफ करण्यासाठी महापालिकेने दहा दिवसांपूर्वी निविदा प्रक्रियाही राबवली होती. मागीलवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पावसाळाही लांबला होता. एवढेच नव्हे तर, 25 सप्टेंबरला झालेल्या तुफान पावसाने शहरातील ओढे, नालेच नव्हे तर रस्त्यांनाही पूर आला होता. या पुरामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवित आणि वित्त हानी झाली. सखल भागातील सोसायट्यांमधील पार्किंग तसेच बंगल्यांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बुडाली, किंमती वस्तूंचे आणि कागदपत्रांचे नुकसान झाले आहे.
शहराच्या मध्यातून कात्रज ते दत्तवाडीदरम्यान वाहणाऱ्या आंबिल ओढ्याच्या कडेच्या परिसरात सर्वाधिक नुकसान झाले. 30 हून अधिक जेसीबी, पोकलेन मशीन्स प्रशासनाने आंबिल ओढ्याच्या उगमापासून अर्थात कात्रज तलावाच्या सांडवा भिंतीपासून ओढ्याच्या पात्रातील गाळ आणि राडारोडा हटवण्याचे काम हाती घेतले आहे. मित्रमंडळ चौक, सानेगुरुजी वसाहत अशा विविध टप्प्यांत एकाचवेळी राडारोडा काढण्याचे काम करण्यासाठी 30 हून अधिक जेसीबी आणि पोकलेन मशीन्स लावण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर गर्दी नसल्याने गाळ आणि राडारोड्याची वाहतूकही विनाअडथळा वेगाने सुरू आहे. येत्या 10 मे पर्यंत आंबिल ओढ्यातील गाळ आणि राडारोडा काढण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, ते पूर्ण करू असे आश्वासन गेडाम यांनी दिले आहे.