सोलापूर – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असलेली लावणी कलाकार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. ‘गौतमी पाटील तिच्या डान्समधून अश्लीलता पसरवतेय आहे’ त्यामुळे तिचे कार्यक्रम बंद करा असं अनेक ठिकाणी बोललं जात आहे. तर दुसरीकडे लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या ह्याच लावणी कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकतंच सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेमध्ये तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली होती. यावेळी एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. गौतमीच्या डान्सवर आणि तिच्या दिलखेच अदांवर नातेपुतेकर चांगलेच थिरकले होते. मात्र, यावेळी अक्षरशः तरुणांनी खुर्च्या मोडल्या अन् बॅरिकेटिंग तोडून थेट स्टेजपर्यंत गेले. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे.
गर्दीला आवरण्यासाठी कार्यक्रमस्थळी बॅरिकेटिंग लावण्यात आले होते. तरुणांनी बॅरिकेटींग तोडून आत प्रवेश केला. यावरून गर्दी किती होती याचा अंदाज येईल. गौतमीचा डान्स सुरू असतानाच हा गोंधळ सुरू झाला. काही दिवसांपूर्वी सांगली येथील बेडगमध्ये लोकांनी सरकारी शाळेचे कौलारू छत फोडले आणि झाडे सुद्धा पडली होती. आणि आता पुन्हा एकदा गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं दिसून आलं.