मुंबई – अमेलिया केरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबईने यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत थेट स्थान मिळवले आहे.
मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत बंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मुंबईच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 20 षटकांत 9 बाद 126 असा रोखला गेला. मुंबईकडून कर्णधार स्मृती मानधना पुन्हा एकदा स्थिरावल्यावर बाद झाली. तिने 25 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 24 धावा केल्या.
भरात असलेल्या सोफी डीव्हाइनने मात्र, साफ निराशा केली. यानंतर एलिस पेरीने हेदर नाइटच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. नाइट 12 धावांवर तर चांगली खेळत असलेली पेरी 29 धावांवर परतली. तिने या खेळीत 38 चेंडूत 3 चौकार फटकावले. कनिका अहुजाने सुरुवात चांगली केल्यावरही अवघ्या 12 धावाच केल्या.
यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने 29 धावांची आक्रमक खेळी करताना 13 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावताना संघाचे शतक फलकावर लावले. त्यानंतर मात्र, तळातील फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली. मुंबईकडून अमेलिया केरने सर्वाधिक 3 गडी बाद केले. सीवर ब्रंट व इसी वॉंगने प्रत्येका 2 बळी घेतले.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही आक्रमक झाली. सलामीवीर यस्तिका भाटीया व हेलि मॅथ्युज यांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. यस्तिका 26 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 30 धावांवर तर मॅथ्युज 17 चेंडूत 2 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 24 धावांवर परतली. सीवर ब्रंट 12 व कर्णधार हरमनप्रीत कौर 2 यांनी निराशा केली.
Bounced back in our own 𝗠𝗜ghty way! 💪💙#OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPL2023 #RCBvMI pic.twitter.com/LiYaye27vH
— Mumbai Indians (@mipaltan) March 21, 2023
त्याचवेळी अष्टपैलू अमेलिया केरने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत चौफेर टोलेबाजी केली. तिला पूजा वस्त्रकारने तुल्यबळ साथ दिली व संघाचे शतक फलकावर लावले. पूजा 18 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावांवर परतली. इसी वॉग तर खातेही उघडू शकली नाही. अशावेळी केर हीने आक्रमक फलंदाजी करत संघाचा विजय साकर केला. ती 27 चेंडूत 4 चौकारांसह 31 धावांवर नाबाद राहिली. बंगळुरुकडून कनिका अहुजाने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
रॉयल चॅलेंजर बंगळुरु – महिला आयपीएल 20 षटकांत 9 बाद 125 धावा. (एलिस पेरी 29, रिचा घोष 29, स्मृती मानधना 24, अमेलिया केर 3-22, सीवर ब्रंट 2-24, इसी वॉंग 2-26).
मुंबई इंडियन्स – 16.3 षटकांत 6 बाद 129 धावा. (सीवर ब्रंट 13, पुजा वस्त्रकार 19, यस्तिका भाटीया 30, हेली मॅथ्युज 24, अमेलिया केर नाबाद 31, कनिका अहुजा 2-5).