न्यूझीलंड संघाचा स्टार फलंदाज रचिन रवींद्रने दुखापतीमधून सावरून बांगलादेश विरुद्ध जोरदार कमबॅक केले. त्याने नुसते कमबॅक केले नाही तर एक मोठा वर्ल्ड रेकॉर्डदेखील आपल्या नावावर केला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रचिन रवींद्रने बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. चॅम्पियन्स ट्रॉफीतील बांगलादेशविरूद्ध सामन्यात आजारपणामुळे बाहेर पडलेल्या डॅरिल मिचेलच्या जागी रचिनने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. न्यूझीलंडने धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात केल्यानंतर २५ वर्षीय रचिन चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने डेव्हॉन कॉन्वेच्या मदतीने त्याने संघाचा डाव सावरला. त्याने डेव्हॉन कॉन्वेसह तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भक्कम भागीदारी, तसेच टॉम लॅथमसह चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. त्याने या सामन्यात १०५ चेंडूत ११२ धावा केल्या. त्याच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठली. रचिन रवींद्रने केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड क्रिकेट विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन्ही सामन्यांमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. या युवा खेळाडूने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०२३ विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात त्याने शतक झळकावत या ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. क्रिकेटच्या इतिहासात, १९ खेळाडूंनी एकदिवसीय विश्वचषकात पदार्पणात शतक झळकावले आहे आणि १५ खेळाडूंनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पणातच शतक केले आहे. पण पदार्पणात शतक झळकावणारा रचिन हा दोन्ही यादीतील जगातील एकमेव खेळाडू आहे.