पिंपरी | सुट्टीच्या दिवशीही मिळणार रेबीजची लस

पिंपरी, (प्रतिनिधी) – सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील रेबीजची लस मिळणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. महापालिका रुग्णालयात या सुविधा मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून ही लस रुग्णांना देण्यासाठी देखील कार्यवाही करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत महापालिका रुग्णालयात रेबीजच्या लसींच्या तुटवड्याच्या सातत्याने समस्या निर्माण झाल्या होत्या. सध्या सर्वच रुग्णालयात पुरेशी लस उपलब्ध करण्यात आली आहे. रेबीजच्या लसींची सातत्याने मागणी होत आहे. दिवसाकाठी सुमारे ५० जणांना ही लस दिली जात असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय प्रशासनाने सांगितले.
गेल्या वर्षभरामध्ये सुमारे २५ हजार ८७० जणांना रेबीजची लस देण्यात आली आहे. सध्या वैद्यकीय विभागाकडे २ हजार ८० लस शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. लस घेणाऱ्या नागरिकांना पाच ते सात वेळा दिलेल्या मुदतीत लस घ्यावी लागत आहे. अनेकांना सुट्टीच्या दिवशी लस घेण्याची मुदत मिळत आहे.
या वेळी कर्मचारी नसल्याने लस देताना अडचणी येत आहेत. तसेच लस मिळेल की नाही या बाबत नागरिकांमध्ये शंका असायच्या. मात्र सुट्टी असली तरी लस दिली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टळणार आहे.
या बरोबच सुट्टीच्या दिवशी रेबीजची लस देताना अतिदक्षता विभागाच्या रांगेत नागरिकांना उभे रहावे लागत होते. या वेळी येणारे रुग्ण पाहून लस घेणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचा विचार वैद्यकीय विभागाचा आहे. सध्या वायसीएममध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या ३२ नंबरच्या कक्षाशेजारील मोकळ्या जागेत सुट्टीच्या दिवशी रेबीज लस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.





