कान्हे – मावळ तालुक्यात खरीप हंगामाची भात कापणी जवळपास पूर्ण होताच रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. नाणे मावळ, पवन मावळ, अंदर मावळ तसेच तालुक्यातील इतर ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या उत्साहाने रब्बी पिकांच्या पेरणीकडे वळले आहेत. यंदा विशेषतः गावरान हरभरा, वाटाणा, गहू आणि तूर या पिकांना प्राधान्य दिले जात आहे. अनुकूल हवामान, जमिनीत मुबलक असलेला ओलावा आणि बाजारातील मागणी या तिन्ही घटकांचा अनुकूल परिणाम यंदाच्या रब्बी हंगामावर दिसून येत आहे. मावळ तालुका हा प्रामुख्याने भात उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर भातपीक घेतल्यानंतर भाताच्या काढणीनंतर लगेचच शेतातील ओलावा आणि पाण्याची स्थिती लक्षात घेऊन रब्बी पिकांची लागवड केली जाते. यंदा मान्सूनचा पाऊस नियमित आणि भरपूर झाल्याने जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. तालुक्यात डोंगराळ आणि मध्यम काळ्या जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात हरभरा, वाटाणा आणि तूर ही पिके चांगली उत्पादन देतात. याशिवाय सपाट आणि थोडी खोल जमिनीत गहू पिकालाही चांगली परिस्थिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात विविध प्रकारच्या रब्बी पिकांची पेरणी एकाच वेळी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत गावरान पिकांची मागणी चांगलीच वाढली आहे. विशेषतः गावरान हरभरा आणि वाटाणा यांना बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकरी या पिकांकडे अधिक आकर्षित झाले आहेत. रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून आणि पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या या पिकांमुळे उत्पादन खर्च तुलनेने कमी येतो, तसेच विक्रीत चांगला नफा मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा कल याकडे वाढताना दिसत आहे. शेतकरी आता केवळ उत्पादनावरच नव्हे, तर बाजारपेठेतील मागणी, खर्च आणि नफा याचाही विचार करून पीकनिवड करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. चांगल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बहुतांश शेतजमिनीत पाणी साठले होते. भात काढणीनंतर हीच आर्द्रता रब्बी पेरणीसाठी पोषक ठरत आहे. अनेक ठिकाणी जमिनीचा वाफसा योग्य स्थितीत असल्याने शेतकरी बैलजोडी तसेच ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत करून पेरणी करत आहेत. काही भागांत पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्रातही वेगाने काम सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मशागत, पेरणी आणि खत व्यवस्थापनाची लगबग पाहायला मिळत आहे. पिकांसाठी पोषक वातावरण हरभरा आणि वाटाणा या पिकांसोबतच गहू आणि तूर पिकांनाही यंदा चांगली संधी असल्याचे चित्र आहे. गहू पिकासाठी थंड आणि कोरडे वातावरण आवश्यक असते, तर सध्याच्या परिस्थितीत रात्रीचे तापमान हळूहळू घटत असून दिवसाचे तापमानही नियंत्रित आहे. त्यामुळे गहू पिकाच्या उगवणीस आणि वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. तूर हे पीक तुलनेने दीर्घ कालावधीचे असले तरी शिल्लक ओलावा आणि उपलब्ध पाण्यावर त्याची लागवड करता येते. त्यामुळे तुरीची पेरणीही अनेक शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. रब्बी हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मावळ तालुक्यातील रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. खरीप हंगामातील भात पिकातून मिळालेल्या उत्पन्नावर अनेक शेतकरी रब्बी पिकासाठी गुंतवणूक करतात. यंदा भात उत्पादन चांगले झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात थोडे भांडवल उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बी-बियाणे, खत आणि मशागतीसाठी आवश्यक खर्च करण्यास शेतकरी सक्षम असल्याचे दिसते. याचा थेट परिणाम रब्बी पेरणीच्या गतीवर झाला आहे. एकूणच, अनुकूल हवामान, जमिनीत पुरेसा ओलावा, चांगली बाजारपेठ आणि शेतकऱ्यांचा वाढता आत्मविश्वास यामुळे मावळ तालुक्यातील रब्बी हंगाम आशादायक वाटत आहे. जर पुढील काळात हवामानाने साथ दिली, तर यंदा रब्बी पिकांचे उत्पादन लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा रब्बी हंगाम आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘यंदा पेरणीसाठी हवामान योग्य आहे. सर्वत्र जमिनीमध्ये ओलावा असल्याने गावरान हरभरा मसूर वाटाणा या पिकांसाठी पोषक आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. गावरान हरभरा वाटाणा यांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते.’ – शिलाबाई येवले, शेतकरी, नायगाव