Pimpri : रब्बी हंगामातील पिके जोमात, बळीराजा व्यस्त शेतीकामात

नाणे मावळ : नाणे मावळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या रब्बी हंगामातील शेतीच्या कामांची धांदल उडाली आहे. थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना चांगला बहर आला असून ज्वारी पिकाच्या मशागती बरोबर ऊस तोडणीची कामे वेगात सुरू आहेत. रब्बी हंगामातील पिकांना, लावलेल्या उसाला पाणी देण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र कामात व्यस्त दिसत आहे.
यंदा दमदार पाऊस झाल्याने थंडीचाही जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या आठवड्यात सात – आठ दिवस ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली होती. परंतु आता पुन्हा थंडीने चांगली सुरुवात केल्याने रब्बी हंगामातील पिके जोमाने वाढत आहेत. या पिकांच्या मशागती बरोबर सध्या ऊस तोडणीचा हंगाम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे.
नाणे गावच्या परिसरात ज्वारीचे पीक चांगले आले असून शेतकऱ्यांना यंदा वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. रब्बी पेरणी हंगामाला थंडीची साथ असल्याने पिकांची चांगली वाढ होत आहे. मावळ – मुळशी तालुक्यातील साखर कारखान्यांनी गाळपास सुरुवात केल्याने परिसरात जागोजागी उसाच्या फडातून ऊसतोड सुरू आहे. तोडलेले ऊस कारखान्याकडे नेण्यासाठी ट्रॅक्टर व बैलगाड्यांची भिरभिर वाढली आहे.
पहाटेपासूनच ऊसतोड मजुरांचा शिवारात गलबलाट सुरू आहे. कारखान्याकडून समाधानकारक दर देण्यात येणाऱ्या बऱ्याच ऊसतोड टोळ्या येऊन दाखल झालेल्या आहेत. ऊस तोडीमुळे अनेक ठिकाणची उसाची शिवारे मोकळी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ऊस लागवडीबरोबर कांदे, बटाटे व इतर भाज्या यांचीही लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.
यंत्र आणि तंत्र यांच्या युगातही शेतीचे महत्व अनन्य साधारण आहे. शेती हा मावळ तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नाणे मावळ परिसरातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. सध्या रब्बी हंगाम सुरू असून परिसरातील शेतशिवारात रब्बीची पिके चांगलीच बहरली आहेत, यामुळे शेतकरी समाधानी आहे.
– साईनाथ गायकवाड-पाटील, माजी सरपंच, कांब्रे ना.मा.
नाणे मावळ हा मावळचा सुजलाम् सुफलाम् भाग आहे. पर्यटन सोबतच येथे शेतीचे प्रमाण अधिक असून शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. शेती आणि पर्यटन यामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांना चांगले आर्थिक पाठबळ मिळत आहे.
– राजू नाणेकर, युवा उद्योजक





