वाल्हे, – मागील आठवड्यात रब्बी हंगामातील पिकांना पोषक अशी थंडी पडत होती. मात्र, दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी होऊन हवामानात बदल होत असून सोमवार, मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाची शक्यता व ढगाळ हवामान यामुळे रब्बीतील कांदा, गहू, ज्वारी,हरभरा, तूर, पालेभाज्या आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रब्बीतील हंगामातील पिकांना थंडी पोषक ठरत असले तरी ढगाळ हवामानामुळे मात्र पिकांवर रोगराईचा प्रादुभाव वाढतो. सध्या गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा आदि पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून पिके जोमात आली आहेत. कांद्याच्या रोपांचे तरवे तयार आहेत. काही ठिकाणी कांदा लागण सुरू आहे तर काही ठिकाणी पेरणी केलेला कांदा उगवून जोर धरू लागला आहे. पहाटे पडणारे धुके झाडण्यासाठी कांदा उत्पादकांची धांदल उडत आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून वातावरणाचा नूर पालटला असून ढगाळ हवामान राहत आहे. ढगाळ हवामानामुळे कांद्याच्या पाती करपणे, गहू, ज्वारीवरीची पानेदेखील पिवळी पडतात. तर मिरच्या, पालेभाज्यांवर तुडतुडी, पाने खाणा-या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने कीडनाशकांच्या फवारणीचा खर्च वाढणार आहे.सध्या थंडीचा कडाका कमी होऊन ढगाळ हवामानात वाढ झाली आहे.याचा थेट परिणाम विविध पिकांवर होत आहे. धुक्याची दुर्लक्ष वाढल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिके धोक्यात आली आहे. ऊस उत्पादकांची चिंता वाढणार… साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असला तरी दरवर्षीच्या तुलनेत यंदा एक ते दीड महिना उशिरा ऊसतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आडसाली ऊस तुटण्यास आधीच उशीर झाला आहे. अशात अवकाळी पाऊस झाला तर तोडणी आणखी लांबणार आहे. शिवाय, तोडलेला ऊस रस्त्यावर काढण्यासाठी वाहतुकीचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. आधीच दीड वर्षे पीक शेतात अन् त्यात आस्मानी संकट ओढवण्याच्या शक्यतेने ऊस उत्पादकांची चिंता वाढणार आहे.