नवी दिल्ली – देशात यावर्षी आतापर्यंत 5 कोटी 80 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधी झालेल्या पेरण्याच्या तुलनेत ही संख्या सुमारे आठ लाख हेक्टरने अधिक आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 19 डिसेंबरपर्यंतच्या रब्बी पिकांखालील क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गव्हाखालील क्षेत्र 301 लाख हेक्टरपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 300 लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. कडधान्याखालील क्षेत्र 126 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे, तर भाताच्या क्षेत्रात 13 लाख हेक्टरपेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाली आहे, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी म्हणजेच 2025-26 मध्ये रबी पिकांच्या लागवड क्षेत्रात 8 लाख हेक्टरची भर पडली आहे. डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र यावर्षी 3.72 लाख हेक्टरने वाढले असून, हरभरा लागवडीच्या क्षेत्रात 4.89लाख हेक्टरची भरीव वाढ नोंदवण्यात आली आहे. तर रेपसीड आणि मोहोरी या पिकांच्या लागवडीतील चालनेसह तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ होऊन ते 93.33 लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.