Pimpri : पूर्व मावळात रब्बी पिके जोमात

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच या पिकांची उगवणही अतिशय चांगली आणि जोमात होत आहे. त्यामुळे या भागातले शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.रब्बी पिकाचा हंगाम हा मावळ तालुक्यात साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांमध्ये सुरू होतो. तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा ही पिके प्राधान्याने घेतली जातात. तर पश्चिम पट्ट्यातील भात खाचरांमध्ये मसूर, वाटाणा आदी पिके घेतली जातात.
मावळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील तळेगाव दाभाडे, इंदुरी, सुदुंबरे, सुदवडी, नवलाख उंबरे, वराळे, नानवली, कोटेश्वरवाडी, शेलारवाडी, कुंडमळा, सोमाटणे, सांगवडे, साळुंब्रे, दारुंब्रे, शिरगाव, सोमाटणे, धामणे, परंदवडी, उर्से, बेबडओहळ,चांदखेड, कासारसाई, पाचाणे, पुसाणे, आढले आदी गावांमध्ये दिवाळी आधीच रब्बी पिकाच्या पेरण्या उरकल्या असल्याचे कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले. ही पिके परतीच्या पावसाच्या काळातच पेरण्या झाल्यामुळे अतिशय जोमात आलेली आहे, असे कृषी सहाय्यक अधिकारी अक्षय ढोमणे यांनी सांगितले.
मावळ तालुक्यात यावर्षी मान्सूनच्या परतीच्या पावसाने मोठा तडका दिला होता. त्यामुळे खरीप भात पिकाच्या कापण्या रखडल्या होत्या. तर काही ठिकाणी भात खासरांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने भात कापणी नंतरही त्या ठिकाणी रब्बी मसूर, वाटाणा या पिकाच्या पेरण्या दीर्घकाळपर्यंत रखडल्या होत्या, असे असे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले. मावळ तालुक्याच्या पूर्वपट्यात सध्या रब्बी ज्वारी आणि गहू हरभरा ही पिके चांगली उगवली असून अतिशय जोमात आलेली आहेत.
पूर्वपट्ट्यात रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र
मावळ तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात रब्बी पिकाचे क्षेत्र मोठे आहे. त्यापैकी गहू साधारणपणे ४०० हेक्टर क्षेत्रावर घेतला जातो. तर ज्वारी ८०० ते ९०० हेक्टर क्षेत्रात घेतली जाते. याशिवाय ५०० हेक्टर वर रब्बी हरभऱ्याचे पीक घेतले जाते. मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात या पिकाच्या पेरण्या साधारणपणे एक महिन्यापूर्वी सुरू झाल्या होत्या. त्याची उगवण अतिशय चांगली होऊन सध्या ज्वारीचे पीक खूपच जोमात आलेली आहे.





