R Madhavan: बॉलीवूड अभिनेता आर. माधवन सध्या लेह (लडाख) येथे अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लेह विमानतळावरची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. स्वतः माधवनने इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. माधवनने आपल्या हॉटेलच्या खिडकीतून घेतलेला व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात बर्फाच्छादित डोंगर आणि ढगांनी वेढलेलं आकाश दिसत आहे. त्याने सांगितले की, “ऑगस्ट महिना असूनही डोंगरांवर बर्फ पडला आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विमान उड्डाणे बंद आहेत आणि त्यामुळे मी लेहमध्ये अडकून पडलो आहे.” यावेळी त्याने 2008 मध्ये ‘3 इडियट्स’च्या शूटिंगदरम्यान घडलेली आठवणही सांगितली. “मी शेवटचं 2008 मध्ये ‘3 इडियट्स’च्या शूटसाठी लेहला आलो होतो. त्यावेळीही अचानक बर्फवृष्टी झाली आणि शूट थांबवावं लागलं होतं. आता पुन्हा अगदी तसंच झालंय. पण या सगळ्यातही लेह अतिशय सुंदर दिसतंय,” असं तो म्हणाला. व्हिडीओ शेअर करताना माधवनने लिहिलं आहे, “पुन्हा लेहमध्ये अडकलोय… उड्डाणं नाहीत. 17 वर्षांनी पुन्हा मुसळधार पाऊस.” गेल्या काही दिवसांपासून झालेल्या खराब हवामानामुळे लेह विमानतळाचा रनवे बंद ठेवण्यात आला असून दिल्ली विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना सूचना जारी केल्या आहेत. माधवनची करिअर अपडेट्स माधवन शेवटचा फातिमा सना शेखसोबतच्या “आप जैसा कोई” या नेटफ्लिक्स चित्रपटात दिसला होता. आता तो “धुरंधर” या चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपालही झळकणार आहेत.