चेन्नई : अण्णा द्रमुक व भाजप यांची युतीनंतर वाढलेल्या प्रभावामुळे द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन स्वस्त थट्टेचे राजकारण करत असल्याचा आरोप अण्णाद्रमुकचे नेते आर. बी. उदयकुमार यांनी केले. डीएमके युवा शाखेच्या उत्तर विभागीय परिषदेत उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन उदयकुमार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. रविवारी तिरुवन्नामलाई येथे झालेल्या सभेत उदयनिधी स्टॅलिन यांनी युतीची खिल्ली उडवली होती. त्यांनी अण्णा द्रमुकला इंजिन नसलेली गाडी असे म्हणताना, त्यांची गाडी भाजप ओढत असल्याची टीका केली होती. याबरोबरीने तामिळनाडू कधीही दिल्लीच्या नियंत्रणाखाली जाणार नाही, असे स्पष्ट मत उदयनिधी स्टॅलिन यांनी व्यक्त केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना उदयकुमार म्हणाले की, 2026 च्या विधानसभा निवडणूकांपूर्वी द्रमुक पक्षाच्या गोटात घबराट निर्माण झाली आहे. त्याचेच प्रतिबिंब त्यांनी केलेल्या टिपणीत दिसून येत आहे. अनेक दशकांपेक्षा जास्त सत्तेत राहिलेल्या व लोकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पक्षाला असे नाकारता येणार नाही, हे देखील उदयकुमार यांनी स्पष्ट केले. यावेळी उदयकुमार यांनी उदयनिधी यांनी केलेल्या वैयक्तिक टोमण्यांवर भर दिला. महागाई, कायदा-सुव्यवस्था व बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर सत्ताधारी मौन बाळगत असल्याचे सांगताना त्यांनी उदयनिधी हे राजकिय सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत असल्याचा त्यांनी आरोप केला. याबाबत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी हस्तक्षेप करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.