पुणे – सायबर फसवणुकीच्या वाढलेल्या घटना रोखण्यासाठी क्विक हिल फाउंडेशन महाराष्ट्रासह काही राज्यातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करीत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणि शैक्षणिक संस्थांनी उत्कृष्ट काम केले आहे अशा विद्यार्थ्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्ष अनुपमा काटकर. क्विक हिल कंपनीचे अध्यक्ष डॉ.कैलास काटकर, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवे उपस्थित होते. क्विक हिल फाउंडेशनने कमवा आणि शिका या धोरणातर्गत विविध राज्याच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही योजना राबविली आहे. हे विद्यार्थी उत्कृष्टपणे काम करत आहेत याची दखल राज्यपालांनी घेतली.
या उपक्रमात 120 शैक्षणिक संस्था आणि 4,600 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती अनुपमा काटकर यांनी दिली. यामुळे सायबर सुरक्षेची माहिती देशातील 55.92 लाख विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली आहे. या कार्यक्रमात राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांच्या आणि क्विक हिल फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले. देशात सध्या सायबर गुन्हेगारी वाढली आहे.
यामुळे या उपक्रमाचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर आपण राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूशी चर्चा करणार आहोत आणि या विषयावर एखादा लघु पल्ल्याचा अभ्यासक्रम तयार करण्याच्या शक्यता आजमावणार आहोत.
या उपक्रमात भाग घेणारे विद्यार्थी कमकुवत गटातील आहेत. यामुळे सायबर सुरक्षेबाबत वातावरण निर्मिती होण्याबरोबरच या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत आहे. त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण होत आहेत याबद्दल आपल्याला आनंद वाटत आहे असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले. कंपनी आगामी काळात या योजनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.