पिंपरी | बत्ती गुल, पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा नवी सांगवी येथील प्रकार

पिंपरी, (प्रतिनिधी) – महावितरणकडून विजेचा लपंडाप हा सतत सुरुच असतो. त्यात गुरुवार हा तर महावितरणचा हक्काचा वार आहे. या दिवशी वीज पुरवठा खंडित करणे हा जणू काही महावितरणच अधिकारच झाला आहे. याच क्रमात नवी सांगवी परिसरात दुपारच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाला आणि पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागल्या.
बराच वेळ वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने दुसऱ्या पेट्रोल पंपापर्यंत जाण्यासाठी अनेकांना दुचाकीला धक्का मारावा लागला तर अनेकजण धक्का मारणे शक्य नसल्याने किमान तासभर वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहत थांबले होते.
नवी सांगवीतील पेट्रोलपंपावर कायम गर्दी असते. या परिसरात आयटीयन्स व इतर कर्मचारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. हे कर्मचारी शिफ्टमध्ये काम करतात. यामुळे सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर गर्दी असते. ज्यांच्या गाडीतील पेट्रोल संपून गेले होते किंवा खूपच थोडे उरले होते.
त्यांना रांगेतच थांबावे लागले तर काहींनी धक्का मारत गाडी घरी नेऊन लावली आणि रिक्षा, बसने नोकरीचे ठिकाण गाठले. बहुतेक वाहनचालक जुनी सांगवी येथील पेट्रोल पंपावर गेले त्यामुळे तिथे देखील लांबच लांब रांगा लागल्या होत्या.





