प्रभात वृत्तसेवा पुणे : गुरूवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात तिथे पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. आदित्य यादव (१८ वर्षे) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर एनडीएत विद्यार्थ्याची जीव जाण्याची दुसरी घटना आहे. गुरूवारी संध्याकाळी पोहाण्यात अकुशल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेल्या सरावादरम्यान हा अपघात झाल्याचे एनडीएकडून सांगण्यात आले आहे. प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली होत असलेल्या या सरावादरम्यान आदित्य आणि त्याच्या सोबतचे प्रशिक्षणार्थी पूलात पोहत असताना आदित्य पाण्यात बुडलेला आढळला. हे लक्षात येताच तिथे तैनात असलेल्या दोन लाइफगार्ड्सने पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. त्यानंतर तिथे त्याला सीपीआर (हृद्य – फुफ्फुस पुनरुज्जीवन) देत त्याचे प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीने या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करत, झालेल्या घटनेबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेची माहिती पोलीस तसेच विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना देण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्यच्या वर्षात शिकत असलेल्या अंतरिक्ष कुमार सिंग नावाच्या विद्यार्थ्याने रॅगिंगने त्रस्त होऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर १५ दिवसात असा अपघात घडल्याने एनडीएत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यापूर्वीही घडलेल्या अऩेक अपघातात विद्यार्थ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे किंवा अपंगत्व आले आहे. अशा अपघातात मृत किंवा अपंग झालेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून आर्थिक मदत व निवृत्तीवेतन दिले जाते. मात्र ही रक्कम अतिशय कमी असल्याने अनेकदा अपंग विद्यार्थ्यांना त्यांचे उपचार करणे देखील अशक्यप्राय ठरते, तर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही.