पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेवर प्रश्‍नचिन्ह

ऑफलाइनद्वारे परीक्षा घेण्याची अधिसभा सदस्यांची मागणी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्यास प्राधान्य दिले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्यास हरकत नाही. मात्र, ऑनलाइन सुविधा सर्वच विद्यार्थ्यांकडे नाहीत. त्याचा विचार करून आणि विद्यापीठाची गुणवत्ता टिकविण्यासाठी पारपंरिक अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाइनद्वारे घेण्यात येऊ नये, अशी मागणी करीत अधिसभा सदस्यांनी ऑनलाइन परीक्षांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

 

सध्या विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. या परीक्षा ऑनलाइनद्वारे होणार असल्याचे दिसून येत आहे.

 

मात्र, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेसाठी आग्रह धरणे चुकीचे आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन अर्थात पूर्वीप्रमाणेच घेण्यात यावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

अधिसभा सदस्य प्राचार्य संजय खरात, दादाभाऊ शिनलकर, संतोष ढोरे, अभिषेक बोके, शशिकांत तिकोटे, बागेश्री मंठाळकर आणि प्राचार्य सुनीता आढाव यांनी ही मागणी केली. त्याचबरोबर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सचिव प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांचीही निवेदनावर स्वाक्षरी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.