पिंपरी | नालेसफाईच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ढगफुटी होऊन आपत्ती निवारणाचा प्रश्न निर्माण झाल्याने आयुक्तांनी तातडीने रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्गावरील वाहतुकीला होणारे अडथळे दूर करण्यासाठी त्याठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी.
उड्डाणपूल, मोठ्या जुन्या इमारती आदी ठिकाणी पक्षांच्या बीज वहनामुळे वाढलेली झाडे-झुडपे तातडीने काढू टाकावीत, पुलावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी अडसर ठरणारा कचरा काढून स्वच्छता करण्यात यावी. येत्या सात दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त शिखर सिंह यांनी स्थापत्य विभागाला दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने भोसरी परिसरातील इंद्रायणीनगर, बालाजीनगर झोपडपट्टी, चक्रपाणी वसाहत, आदीनाथ नगर आदी भागात राहणा-या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. रात्रभर नागरिकांना घरातील पाणी बाहेर काढावे लागल्याने त्यांची तारांबळ झाली.
घरातील विद्युत उपकरणे, संसारोपयोगी वस्तू, खाद्य पदार्थांचे नुकसान झाले. काही ठिकाणी साठलेल्या पाण्यात वाहने अडकून पडली. नालेसफाई वेळेत पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याची आयुक्त शेखर सिंह यांनी दखल घेतली असून आपत्ती निवारणाच्या दृष्टीकोनातून आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी आयुक्तांनी शहरातील नाल्यांच्या साफसफाईची स्वतः शहरात फिरून पाहणी केली. त्यावेळी काही त्रुटी लक्षात आल्याने त्यांनी त्याचक्षणी आरोग्य विभागाचे उपायुक्त यशवंत डांगे यांना स्वच्छता करुन घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी शहरातील उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मोठ्या इमारतींची तपासणी करुन संभाव्य आपत्तीसदृष्य परिस्थितीचा आढावा घ्यावा.
पक्षांमार्फत बीज वहनामुळे उगवलेली झाडे-झुडपे काढून टाकण्यात यावीत. उड्डाण पुलावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असणा-या व्यवस्थेतील कचरा काढून स्वच्छता करावी. याबाबत सविस्तर अहवाल तयार करुन सात दिवसांच्या आत आयुक्त कार्यालयात व आपत्ती व्यवस्थापन कक्षात अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश स्थापत्य विभागाला देण्यात आले आहेत.




