नवी दिल्ली –मतदार याद्यांमधील कथित विसंगतींवरून विरोधकांनी सोमवारी संसदेत आक्रमक पवित्रा स्वीकारला. मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे निवडणूक प्रक्रियेच्या प्रामाणिकपणाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हावी, अशी आग्रही मागणी कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केली. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर काही खासदारांनी मतदार याद्यांचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रासह देशभरातून मतदार याद्यांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी विरोधकांची एकमुखी मागणी आहे, असे राहुल शून्य प्रहरावेळी बोलताना म्हणाले. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेत अतिशय आक्रमक भूमिका मांडली. सदोष मतदार याद्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे. मागील काही वर्षांतील निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने झाल्याचे वाटत नाही. निवडणूक आयोगाने योग्य वर्तन केलेले नाही. त्यामुळे आयोगावर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. पुढील वर्षी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी मतदार याद्यांमध्ये सुधारणा केली जावी. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांवेळी त्रुटी समोर आल्या, असे तृणमूलचेच खासदार सौगत रॉय यांनी म्हटले. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत मतदार याद्यांचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी त्यांना संबंधित मुद्द्यावर बोलण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यामुळे मतदार याद्यांमधील कथित विसंगती, त्रुटींवरून संसदेतील वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले.